


पन्हाळा पावनखिंड मोहिमेला दर वर्षी जायचं ह्याच हेतूने ह्याही वर्षी ह्या मोहिमेचे नियोजन केले. ४७ किमी चा प्रवास करायला लागणार हे आधीच माहीत असल्या मुळे बरोबरचे सवंगडीही त्याच ताकदीचे असणे गरजेचे होते !
पुण्याहून निघून बरोबर सकाळी ८.३० वाजता पन्हाळ्याला पोहचलो. आधी ही मोहीम केली असल्यामुळे पुढच्या मोठ्या दिवसाची कल्पना होतीच त्याच प्रमाणे पावले टाकायला सुरुवात केली ती नरवीर बाजी प्रभू देशपांडे ह्यांच्या पुतळ्यापासून. नुकताच पाऊस होऊन गेलेली पायवाट कधी घनदाट जंगलातून तर कधी रानातून जात होती, त्यात मध्येच एखाद दुसरे गाव लागत होते !
म्हाळुंगे गाव सोडले की मसाई पठाराचा चढ येतो आणि मग कस लागतो खऱ्या मावळ्याचा. चढ झाला की ७ डोंगरांचा भला मोठा हिरवा गार मसाई पठार दिसतो आणि मन उल्हासित होते, पायाचा वेग वाढतो ते मसाई देवीचे दर्शन घेण्यासाठी, दर्शन घेऊन थोडा आराम करून पुढे चालायला सुरुवात केली आणि कुंभार वाडा ह्या गावी पोहचलो.
डोक्यावर उन, पायात चिख्खल आणि मनात बाजी प्रभू अश्या काहीश्या परिस्थितीत पुढे मार्गस्थ झालो आणि खोत वाडीत पोहचलो. जेवणं आटोपली आणि मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे अंबवडे गावाच्या दिशेने निघालो. शिवभक्तांचा अखंड गजर चालू होता, शिवरायांची गाणी, त्यांच्या घोषणा ह्यात २ गावे आम्ही कधी मागे टाकली हे कळले देखील नाही. बघता बघता २२ किमी ची पायवाट पार झाली होती, शरीर थकले होते पण मनात एकच गोष्ट होती बाजीप्रभू शेवटच्या श्वासापर्यंत लढले आणि आपण त्यांचे पदस्पर्श झालेल्या वाटेवरून चालू देखील शकत नाही??हाच का तो शिवभक्त, हीच का ती श्रद्धा ?? आणि पाय अजूनच वेगाने चालू लागले !
मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच अंबवडे ला पोहचलो ,ट्रेक च्या ग्रुप ने गरम चहा ची सोय केली आणि सगळा थकवा क्षणात नाहीसा झाला.
ह्या सगळ्या गावांतून जाताना एक गोष्ट लक्षात आली. ते म्हणजे गावातल्या लोकांच निरपेक्ष प्रेम !
दिवस २
शरीरातली ऊर्जा संपली होती, २७ किमी चालून डोक्यावर उन झेलत मुक्कामी आलेले मावळे पुलाव, रस्सा आणि शिरा असा स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेऊन कधी झोपले कळलच नाही.
दिवस उजाडला तसे परत तीच ऊर्जा, तोच जोश आणि तीच स्फूर्ति घेऊन खिंडची वाट धरायला सकाळचे ७ वाजले.
आज परत रात्री पुण्याला येणे अपेक्षित होते त्यामुळे आजचे २२किमी चे अंतर लवकरात लवकर पार करून परतीची वाट धरायची होती, त्यामुळे पाय दुखत असताना देखील पावलांनी वेग धरला होता बघता बघता रिंगे वाडी आली, पातेवाडी मागे सोडली!
आज कालच्या पेक्षा पाय जास्त चिखलात रूतत होते, वाटेत अनेक पाण्याचे झरे, ओढे दिसले. मासावडे गाव पर्यंत तशीच पायवाट आहे पुढे मात्र डेवलपमेंटच्या नावाखाली रस्ता डांबरीकरण झालेले आहे. पांढर पाणी गावाला ऐतिहासिक महत्व आहे, २५ मावळ्यांनी येथे शत्रूला रोखले होते !
मासावडे गावात कानावर आल होत की खिंड १ तासावर आहे, मग काय खिंडीच्या ओढीने, महाराजांचे नाव घेत आणि बाजी प्रभू देशपांडे यांच्या शौर्य कथा एकत पायांनी आणखी वेग धरला आणि १२ च्या सुमारास खिंडीत दाखल झालो.
नरवीर बाजी प्रभूंच्या समाधीचे दर्शन घेतले आणि मग परिसर न्याहाळला आणि मग त्याचा अावाका लक्षात आला, तिथे शत्रूला रोखणं किता अवघड होतं हे लक्षात आलं आणि आम्ही सारेच नतमस्तक होऊन मोहीम पूर्ण केल्याच्या आनंदात विलीन झालो.