बिंबकाळ, शिवकाळ आणि पेशवेकाळ यांची साक्ष देत मोठ्या तोऱ्यात खडा असलेला उत्तर कोकणातला गिरिदुर्ग म्हणजे तांदुळवाडी. काल तांदुळवाडी सर केल्यावर हा किल्ला लोकांना तसा फारसा ज्ञात नाही हे ऐकून जरा नवलच वाटलं. अफाट वनसंपत्तीची खाण असलेला किल्ला आणि आजूबाजूचा परिसर म्हणजे निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच जणू. साधारण सहा महिन्यांपूर्वी तांदुळवाडीचे फोटो पहिले तेव्हापासूनची तिथे जायची इच्छा काल पूर्ण झाली. भर पावसात प्रवास सुरु झाला तेव्हा आज काय अनुभवायला मिळणार आहे याची तिळमात्र ही कल्पना नव्हती.
तांदुळवाडीचा खरा प्रवास सफाळे फाट्यावरून आत शिरलं की सुरु होतो. दोन्ही बाजूला गर्द झाडी आणि ओल्या चिंब रस्त्यावर धावणारी आपली गाडी म्हणजे स्वर्गानुभवच. ही वाट पुढे थेट किल्ल्याच्या पायथ्याशी तांदुळवाडी गावात जाऊन पोहोचते. साधारण 02:30-03:00 तासांच्या प्रवासानंतर तांदुळवाडीचा किल्ला दिसला आणि कधी एकदा थेट टेकाडावर पोहोचतोय असं झालं.
ट्रेक सूरू झाला. दगडांची विशिष्ठ मांडणी करून तयार केलेल्या एक एक पायऱ्या चढत, एक एक टप्पा पार होऊ लागला. हळूहळू पावसाचा जोर वाढत गेला आणि वाटेवरच्या गर्द झाडीत धुक्याची शाल विणली जाऊ लागली. वाटेत अध्येमध्ये येणारे नितळ पाण्याचे झरे पायांना थंडावा देत होते. किल्ले माथ्यावर पोहोचेपर्यंत चोहीकडे दाट धुकं पसरलं होतं त्यामुळे सूर्या वैतारणेचा संगम काही बघता आला नाही.
किल्ल्यावरची एकसंध खडकात असणारी पाण्याची टाकं, भग्नावस्थेतलं आणि झुडुपांमध्ये लपलेलं भवानीमातेचं देऊळ, बांधकामाचे उरलेले ढाचे आणि घडीव चिऱ्यांचा वापर करून तयार केलेली विहीर अजूनही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. गडमाथ्यावर जणू निवडुंगाच्या बागाच तयार झाल्या आहेत. हो, बागाच म्हणावं लागेल. काटेरी निवडुंगाने सुद्धा डोळ्यांची पारणं फेडली. नजर जाईल तिकडे दूरदूरपर्यंत पसरलेला निवडुंग सप्तमातृका स्थानाबाबतच गुपित मात्र आजही लपवून उभा आहे.
गडावर पोहोचलो आणि मुसळधार पावसानेही हजेरी लावली आणि क्षीण बराच हलका झाला. पाहता पाहता पाऊस बोचरा होत गेला आणि सगळेच नखशिखांत ओले झालो.
साधारण असा समज आहे की गड उतरताना फारसा त्रास होत नाही पण तांदुळवाडी किल्ला उतरतानाच खरा कस लागला. पायऱ्या उतरणं हे पायऱ्या चढण्याइतकंच अवघड ठरू शकत आणि गड उतरणंही एक परीक्षा ठरू शकते याचा पावलोपावली प्रत्यय घेत शेवटी लालठाणे धबधब्यावर जाऊन क्षणभर विसावलो आणि बालपणच आठवलं.
परतीचा प्रवास सुरु झाला तेव्हा माझ्यासकट इतर सगळ्यांच्याच पोतडीत भरपूर आठवणी जमा झाल्या होत्या हे नक्की. स्वर्गालाही हेवा वाटावा असा किल्ले तांदुळवाडी फत्ते. 🚩
- नम्रता बर्वे
7 जुलै 2019