रस्ते

Tripoto
9th Apr 2023
Photo of रस्ते by Prashant Dilip Kulkarni
Day 1

रस्ते

आपल्या पु. लं नी ' रस्ते ' ह्या लेखामध्ये त्यांच्या पाहण्यात आलेले वेगवेगळे रस्त्यांचं वर्णन केले आहे. तो लेख ' हसवणूक ' मध्ये वाचायला मिळतो.
        एकेका रस्त्यांचं वर्णन वाचताना तो आख्खा रस्ता डोळ्यासमोर उभा राहतो आणि त्या रस्त्यावरून आपण चालून देखील येतो, त्यांनी वर्णन केलेल्या लोकांसकाट. आता बघा हं. एका रस्त्याच्या सुरुवातीलाच मातीचा एक उंचवटा होता. तर पु. ल म्हणतात की डोक्याखाली उशी घेऊन मुटकुळ करून झोपलेल्या माणसासारखा तो रस्ता दिसतो. आला की नाही डोळ्यासमोर तो मातीचा उंचवटा?
          पु. लं चा तो लेख समोर ठेऊन, बालवाडीचा paper लिहितो आहे असं समजा. ' तुझी सगळ्यात आवडती गोष्ट कोणती ?' च्या basis वर ' तुझा आवडता रस्ता कोणता असं जर विचारलं तर क्षणाचा विलंब न करता मी म्हणेन स्वतः च्या गावी घेऊन जाणारा सगळ्यात आवडता. John Denver आठवला " Country Roads Take Me Home To The Place I belong."
           सगळ्यांत आधी ज्योतिबा पन्हाळ्याचा रस्ता समोर येतो पहिल्यांदा. तसा तो आजही झाडांनी व्यापलेला आहे, पण वीस वर्षांपूर्वी तो शांत सावली देणारा होता. पंचगंगे वरचा पूल ओलांडला की जी झाडी सुरू व्हायची ती थेट वाघबीळ पर्यंत. वाटेत ऊस घेऊन जाणाऱ्या बैलगाड्या किंवा ट्रॅक्टर ट्रॉल्या. मागच्या मागं दहा - बारा ऊस गायब. वाघबीळच्या आधीची ती छोटी छोटी वळणं घेऊन जेव्हा पन्हाळ्याकडे अशी पाटी दिसते न तेव्हां मन वेगळ्याच काळात गेलेलं असतं. ह्याच मार्गावरून महाराज आणि त्यांचे मावळे कित्येकदा गेले असतील. शेकडो वेळा पन्हाळ्यावर गेलो असू आम्ही मित्र मित्र, पण आज ही भेटलो की गप्पांची सुरुवात त्या सहलीं शिवाय होत नाही. त्या आठवणी मनात खोलवर घर करून आहेत.
             तसाच दुसरा रस्ता म्हणजे सिंहगडकडे - पानशेत कडे जाणारा. Magic hour मध्ये किंवा अगदी जेवल्यावर मज्जा म्हणून फेर फटका मारायला इतक्या वर्षांतला अगदी रोजच्या आयुष्यातला, खड्डे न खड्डे पक्के माहीत असलेला असा. पहिला हक्काचा स्टॉप खडकवासला. नाही जिकडे खायच्या गाड्या लागतात तिकडे नाही पाठीमागच्या बाजूला. तिकडे रस्त्याच्या  डाव्याबाजूला एक विशिष्ठ प्रकारची वेल आजूबाजूच्या झाडांवर पसरलेली असते. खुप झाडं आहेत तिथं. पानशेत पर्यंत जाताना खडकवासल्याचं पाणी साथ सोडत नाही. त्याच्या बाजूबाजूंनी वळणं घेत घेत बरीचशी गावं पार करत जावं लागतं. पावसाळ्यात हा रस्ता पर्वणीच असतो. अजून एक स्पॉट असा आहे की पावसाळ्यात पाणी वाढलं की मध्ये एक बेट तयार होते. असाच त्या जागी असताना एक माणूस त्याच्या चार पाच म्हशी घेऊन आला, त्याच गावचा असेल, भरा भरा त्या म्हशी पाण्यात शिरल्या आणि चक्क पोहत पोहत त्या बेटा पर्यंत पोचल्या. ह्याच जागे पासून थोडंसं पुढं गेलं की बऱ्याच अंतरापर्यंत सागाची झाडं आहेत. झाडांनी गच्च भरलेली टेकडी बघून डोळे तृप्त होतात.
काही काही रस्त्यांचा फील वेगळा असतो. ती कोलारू घर, आजूबाजूच्या गावातले रस्ते आपसूक बालपणात घेऊन जातात.
             लिहायला बरेच रस्ते आहेत. पण लेख लांबवण ठीक नाही. वाचणाऱ्याला कंटाळा येऊ नये म्हणून. त्यामुळे अजून एका रस्त्यावरून आपण जाऊन येऊ.
              उडुपी पासून दक्षिण पश्चिमेला बारा तेरा किमी अंतरावर "पाजका क्षेत्र" असं एक स्थान आहे. श्री मध्वाचार्य यांचं जन्मस्थान आहे. मोठं रमणीय ठिकाण आहे. आणि त्यासारखाच excellent आहे तो तिथं पर्यंत पोहचायचा रस्ता. गावं लहान असून सुध्दा रस्ता रुंद होता, छान, quality डांबर वापरलेला आणि सुरक्षिततेसाठीच्या सर्व गोष्टी असलेला. त्यावेळी का कोणास ठाऊक ऑक्टोबर नोव्हेंबर असून पाऊस पडत होता. चार साडे चार ची वेळ असेल. चमकणाऱ्या त्या काळ्याकुट्ट रस्त्याच्या दुतर्फा इतकी घनदाट झाडी आहे की सूर्य प्रकाश खाली पडत नव्हता. वातावरण इतकं गूढ होतं की time travel करुन १६००-१७०० च्या काळात गेलो आहोत, गाडी अगदी ignore केली तर. वाटेतली घरं सुध्दा typical कोकणी पद्धतीची कौलारू. दारापुढे भलंमोठं अंगण, उंच माडाची सुपारीची झाडं. आणि बऱ्याच घरांना मेहंदी किंवा तत्सम झाडांचं कुंपण. असं वाटतं होतं की संपूच नये रस्ता. त्या घनदाट झाडीतल्या रस्त्यात हजार वर्ष विरून जाऊदेत. पण ते शक्य नाही नव्हतं. इष्ट स्थळी पोचून आम्ही परत आलो सुध्दा. पण तो रस्ता स्वप्नांत सुध्दा साथ सोडत नाहीये.
- प्रशांत दिलीप कुलकर्णी

Photo of रस्ते by Prashant Dilip Kulkarni
Photo of रस्ते by Prashant Dilip Kulkarni
Photo of रस्ते by Prashant Dilip Kulkarni
Photo of रस्ते by Prashant Dilip Kulkarni
Photo of रस्ते by Prashant Dilip Kulkarni