भुते आकाशात आहेत!

Tripoto

भुत प्रेत ही कल्पना, फक्त भारतातच नव्हे तर अगदी (आपण ज्यांना पुढारलेले म्हणतो अशा) पाश्चात्य देशांमध्ये देखील होती किंबहुना आज देखील आहे. म्हणुनच वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्स वर घोस्ट हंटर्स सारखे रीयॅलिटी कार्यक्रम दाखवले जातात आणि करोडोंच्या संख्येने लोक हे कार्यक्रम आवडीने पाहतात देखील. आणि आपल्याकडील काही तथाकथित पुढारलेले लोक अंधश्रध्दा निर्मुलनाच्या नावावर भारताला आणि भारतातील चालीरीतींना ढिगभर शिव्या शाप देऊन मोकळे होतात. माझ्या लेखांमध्ये मी कधीही अंधश्रध्दांचे समर्थन करीत नाही, करणार देखील नाही. अंधश्रध्दा निर्मुलन झालेच पाहिजे पण त्यासोबतच आपल्या या महान देशातील उपजत, मुळ ज्ञान-विज्ञान देखील पुनर्संशोधित केले पाहिजे असे मला वाटते. भुत खेत असतात. मानवी संकल्पनांच्या चष्म्यातुन आपण जर पाहिले तर भुत म्हणजे नक्की काय? तर भुत म्हणजे अशी व्यक्ति की जी सध्या अस्तित्वात नाही. कधीतरी अस्तित्वात असणा-या व्यक्तिसाठी भुत हा शब्द वापरला जातो. जे सत्यात म्हणजेच वास्तवात नाही तरी देखील ते आहे असा भास(किंवा अनुभव) होणे म्हणजे भुताचा अनुभव. बरोबर ना?

आपल्या पाच इंद्रीयांच्या जोरावर आपण या समस्त सृष्टीचा अनुभव घेत असतो. या सृष्टीला संस्कृतात प्रपंच असे म्हणतात. प्रपंच या शब्दाची फोड प्र+पंच अशी होते. पंच महाभुतांनी बनलेली म्हणुन हीस प्रपंच असे म्हणतात. दुसरा तर्क असा ही निघु शकतो की आपणच आपल्या पंचेंद्रियांद्वारे या सृष्टीला जन्माला घालत असतो. आपली इंद्रीये असतील तरच आपण या सृष्टीचा अनुभव घेऊ शकतो. आपली इंद्रीये ज्या एका पिंडामध्यी सामवलेली आहेत ते म्हणजे आपले शरीर. तुर्तास "मी" म्हणजे हे शरीर असेच जरी आपण मानले तर आपण कल्पना करु शकाल की जर "मी" नसेल तर या "मी"ला येणारे अनुभव सुध्दा नसतील कारण ही इंद्रीये सुध्दा नसतील. इंद्रीयगोचर जग देखील त्यावेळेस नसेल. बरोबर ना? याचाच अर्थ जे कधीही नव्हते त्या सर्वांचा भ्रमच एका अर्थाने इथे तयार होत असतो. व तो तयार होतो कधी? तर जेव्हा इंद्रीयधारी "मी" चा जन्म होतो. म्हणजे हा "मी" च या सृष्टीला जन्म देत असतो व तो "मी" च शरीर जर्जर झाल्यावर, मृत होताना या सृष्टीचा नाहिसे करतो. त्यामुळे हे विश्व जे इंद्रीयामुळे नुसते अनुभवास येत असे नव्हे तर, इंद्रीयामुळेच बनलेले आहे ते देखील लुप्त होते. त्यामुळेच आपल्या संस्कृतीमध्ये या बाह्य विश्वास प्रपंच म्हणतात. मानवी आकलन क्षमता व व्यक्त होण्याची क्षमता, या खुप म्हणजे खुपच मर्यादीत आहेत. आपण जे काही बोलतो, करतो,विचार करतो ते सर्वच्या सर्व आपल्या मर्यादीत इंद्रीयांनी संकलित केलेल्या माहितीचे पुनःप्रक्षेपण करीत असतो. या जगात नवीन असे काहीही नाही. जे काही आहे ते सर्व येथीलच आहे व ते देखील आपल्या पाच इंद्रीयांच्या कक्षेमध्ये येणारेच आहे. यापुर्वी कुणीतरी कधीतरी आपण जो विचार करीत आहोत तो केलेला आहेच आहे. इंद्रीयांच्या कक्षेबाहेर काय आहे? आपल्याकडे या इंद्रीयांच्या कक्षेबाहेरील अनुभवास किंवा विश्वास "अतींद्रीय" असा एक शब्द वापरला गेलाय गेले हजारो वर्षे. म्हणजेच काय तर आपण ज्यास सत्य वास्तव विश्व म्हणतो ते केवळ आणि केवळ इंद्रीयांच्या भरवशावर चालते. इंद्रीये आहेत तर विश्व आहे इंद्रीये नाहीत विश्व नाही. प्रपंच नाही. वरील परिच्छेद वाचुन तुम्हाला कदाचित असे वाटले असेल की हा लेख एखाद्या आध्यात्मिक विषयावर आहे की काय? बरोबर ना? अध्यात्मामध्ये आणि केवळ अध्यात्मामध्ये अशा अतींद्रीय (इंद्रीयांच्या कक्षेबाहेरील म्हणजे जे इंद्रीयांना गोचर होत नाही असे) सृष्टी व अनुभवाविषयी वर्णन आपणास पहावयास, वाचावयास मिळते मिळते. आपण अध्यात्म म्हणजे जगावेगळे काहीतरी आहे अशापधतीनेच त्याच्याकडे पाहत असतो. त्यामुळेच आपण अशा कोड्यांकडे कधी ही डोळसपणे पाहत नाही. अशी कोडी फक्त अध्यात्मामध्ये किंवा वेद पुराणांमध्येच आहे असे आपल्याला वाटते. पण आपले असे वाटणे म्हणजे आपल्या "कुपमंडुक" विचारसरणीचे लक्षण आहे हे लक्षात असु द्या. सांप्रत वैज्ञानिक नील डीग्रास टायसन त्याच्या एका विश्व प्रसिध्द, स्तुत्य आणि निव्वळ वैज्ञानिक कार्यक्रमाची सुरुवात खालील विधानांनी करतो. लक्षपुर्वक वाचा. "पाहणे किंवा दिसणे म्हणजे विश्वास ठेवणे असे कधीही नसते. आपली इंद्रीये आपल्या फसवु शकतात. जे काही तारे आपण पाहतो ते खरतर जसे दिसतात तसे नसतातच. कधीही आपल्या कल्पनेत सुध्दा नसेल इतके हे ब्रह्मांड, विज्ञानामुळे समजलेले ब्रह्मांड, विचित्र आहे. प्रकाश, काळ (वेळ), अवकाश आणि गुरुत्वाकर्षण एक महान षडयंत्र करुन वास्तव निर्माण करतात. व हे वास्तव आपल्या इंद्रीयांच्या कक्षे बाहेर आहे. अतींद्रीय आहे."

https://nisargshala.in/ghosts-are-real-in-the-sky-camping-star-gazing-near-pune