Monsoon Trek to Karnala Fort

Tripoto
Photo of Monsoon Trek to Karnala Fort by Saurabh Tamhankar

२०१८ मधला मान्सून मला एकही trek करता आला नाही. कारण असे की मी जून ते सप्टेंबर ऑस्ट्रेलियामध्ये होतो. कामानिमित्त. भारतात परतल्यावर पण त्यानंतर एकही trek झाला नव्हता. मग ह्या वर्षी नक्कीच ट्रेक्सना सुरुवात करायची हे नक्की केलं.

आता दीड वर्षात एकही ट्रेक केला नसल्याने आणि जास्त physical activity नसल्याने मी आधी easy trek करायचं ठरवलं. बरं तर मला commercial trek ग्रुप्स बरोबर जायचे नव्हते. आजकाल कळसुबाई, हरिहर आणि लोहगड सारख्या ठिकाणी अक्षरशः ट्रेककर्सच्या जत्रा लागलेल्या असतात. मग ठरवलं आपणच कुठलातरी solo trek करू. म्हणजेज एकट्याने. बरोबर कोणी येणार असेल तर उत्तम. नाहीतर मी एकटाच.

मग करायला सोपे आणि यायला जायला सोपे असे २-३ treks शोधले. म्हटलं कर्नाळा करून घेऊ. कॉलजमध्ये असताना, म्हणजे साधारण २०१०-११ मध्ये हिवाळ्यात हा ट्रेक केला होता. तेव्हा ३-४ तास घेत आरामात वर पर्यंत पोचलो होतो. आणि किल्ल्यापर्यंत जायचा trail पण माहित होता. भटकण्याचा प्रश्नच नव्हता.

मग ठरलं. १५ किंवा १६ जूनला जायचं. लगेच whatsapp, instagram आणि facebook वर मित्रांना सांगितले, मी जातोय, कोणी येणार असेल तर चला. सगळं स्वखर्चानं. १६ जूनला इंडिया-पाकिस्तान मॅचमुळे मी १५ जून नक्की केलं. नंतर फेसबुकवर कर्नाळाचे काही इव्हेंट्स आहेत का ते पाहिले. म्हणजे गर्दीचा थोडा अंदाज. शनिवार आणि जूनची सुरवात असल्याने एकही इव्हेंट दिसला नाही. तेव्हढीच कमी गर्दी.

अगदी शुक्रवारपर्यंत मी एकटाच जाणार होतो, पण संध्याकाळपर्यंत ऑफिस मधले २ जण येणार म्हणाले. त्यात एकाची कार होती. तेवढेच बरे. ऑफिसमधून घरी यायला जरा उशीरच झाला. तसे मी सह्याद्री मध्ये गेल्या पाच एक वर्षात साधारण ४०-५० ट्रेक्स केले होते. त्यामुळे अशी ट्रेक साठी काही वेगळी तयारी करायची गरज नव्हती. सवयीप्रमाणे साडेचार, पावणेपाच आणि पाच असे ३ alarm लावून साडेबारा ला शेवटी झोपलो. ????

सकाळी सगळं आटपून बॅग भरली. ह्यावेळी DSLR नेणार नव्हतो. SJCam action camera आणि OnePlus बरोबर होताच. घरातून निघणार तेव्हढ्यात मित्राचा फोन आला , "अरे माझ्या गाडीची बॅटरी खराब झालीये, तू बाईक काढ, मी पण बाईकने येतो". मग काय, बाईक घेऊन निघालो. वाटेत एका मित्राला pick-up केलं. बाकीचे २ मित्र Powai Lake च्या इथे भेटले. कर्नाळा म्हणजे पनवेलच्या थोडं पुढे. आम्ही पवईवरून ऐरोली, कळंबोली मार्गे पनवेल गाठून पुढे जाणार होतो. पवई तलावाच्या जरा पुढे जाताच धो धो पावसाला सुरुवात झाली. तरी बरोबर बाईक चालवतानाचा wind cheater घातला होताच. पण पावसामुळे आमचा वेग मंदावला. ऐरोलीच्या पुढे पाऊस जरा कमी झाला. जाता जाता कळंबोलीच्या मॅकडोनाल्ड मध्ये थांबलो. Breakfast साठी. एव्हाना ७:३० झाले होते. Breakfast आटोपताच पनवेलच्या दिशेनं निघालो. पुढे ३०-४० मिनटं लागली असतील कर्नाळाच्या entrance ला यायला.

आता कर्नाळा हा एक किल्ला आहे आणि सभोवताली पक्षी अभयारण्य. इथे पार्किंगची व्यवस्था आहे. आमच्या बाईक पार्क करून, तिकीट काढून आम्ही आमच्या ट्रेकचा श्री गणेशा केला. कर्नाळा किल्ल्याची वाट पायथ्यापासून अगदी वरपर्यंत well marked आहे. कुठे हरवायचा प्रश्नच नाही. सुरुवातील ५-१० मिनिटं डांबरी रस्त्यावर चालताना चहा नाश्त्याच्या छोट्या टपऱ्या लागतात. थोडं पुढे गेल्यावर प्राणी संग्रहालयासारखे पक्षी आहेत. बरोबर छोटे प्राणी सुद्धा. तिथून पुढे जाताच उजव्या बाजूने वाट निघते जी किल्ल्यावर घेऊन जाते. इतरत्र जाणाऱ्या वाटा ह्या पक्षी निरीक्षणासाठी आहेत.

बरं, तर ह्या वाटेने आमचा प्रवास सुरु झाला. एव्हाना ९ वाजले होते. आणि सूर्य डोकं वर काढू पाहत होता. सुरुवातीची वाट हि थोडी ओबड धोबड, झाडाझुडुपांतून जात होती. १०-१५ मिनटं चालताच मी घामाघूम झालो होतो. सकाळी बाईक चालवताना जसा पाऊस होता तसा अत्ता हवा होता. पुढे अजून ५-१० मिनिटं चालून झाल्यावर चढ सुरु झाला. हा चढ असाच अजून १५-२० मिनिटं होता. पुढे एक थोडं opening आलं. इथून उजवीकडे वळलो कि मग एक सपाट पायवाट. हा ट्रेक आधी केला असल्याने मला वाटेची कल्पना होतीच आणि अजून किती ट्रेक शिल्लक आहे ते सुद्धा माहित होते. इथेच एक ५ मिनिटांचा छोटा break घेतला.

इथून पुढे परत चालायला सुरुवात केली. एव्हाना थोडे ढग दाटून आले होते, पण पावसाचे काही नाव नव्हते. इथून चालत असताना आता कर्नाळा किल्ल्याचा प्रसिद्ध असा अंगठा एकदम स्पष्ट आणि जवळ दिसत होता.

हा छोटा patch संपताच पुढे पुन्हा एकदा चढ सुरु झाला. Zig zag वळण घेत हा चढ संपतोय तोच जोरदार वारा सुरु झाला. पुढे २ मिनटं चालताच एक छोटी शेड होती. तिथे पोचताच पावसाची एक जोरदार सर आली. पण ती काही थांबेना. थोडा वेळ इथेच थांबलो. समोरच भवानी मातेचे छोटे देऊळ होते. आणि बाजूलाच कर्नाळाचे शेवटचे किल्लेदार वासुदेव बळवंत फडके ह्यांची थोडी माहिती असलेला फलक.

इथे मग पाऊस थांबायची वाट न पाहता पुढे निघालो. पुढे अगदी २-४ पावलं चालल्यावर आपण किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी येतो. इथे safety साठी railings लावले आहेत. पावसामुळे हा भाग थोडा घसरडा होतो. तेवढीच काळजी. तर मग इथून पुढे जाताच किल्ल्यात पोचलो.

इथून आत शिरताच किल्ल्याचे अर्धवट पडलेले बुरुज, काही तटबंदी आणि काही भग्न अवशेष पाहायला मिळतात. समोरच सुळक्याच्या पायथ्याशी छोटया गुहा आणि पाण्याची टाके आहेत. ह्या गुहेच्या बाजूने दुसऱ्या बाजूला जाऊन पुढे माची आहे. इथून कोकण परिसरावर नजर ठेवायला ह्याचा उपयोग व्हायचा.

मग असंच किल्ल्यावर १-२ तास फिरलो, फोटो आणि व्हिडिओ शूट केले. थोडा आराम केला. मग ११:३०-१२ च्या आसपास परतीचा प्रवास सुरु केला. वाटेत जिथे भवानी मातेचे देऊळ होते, तिथे ५ मिनटात पोचलो. तिथे बसून सोबत आणलेले ठेपले, बिस्किटं खाल्ली आणि परत पायथ्याच्या दिशेनं चालायला सुरुवात केली.

पाऊस पडून गेल्याने आता इथे मातीचा सगळा चिखल झाला होता. एक दोन वेळा मी घसरलोच. हळूहळू उतरत होतो. वर जायला आम्हाला साधारण २ तास लागले होते. उतरताना मात्र अगदी दीड एक तासात खाली आलो. ज्या डांबरी रस्त्याने आलो होती, तिथेच छोट्या टपरीवजा उपाहारगृहात थांबलो. थोडी न्याहारी केली. झणझणीत मिसळ आणि गरम गरम बटाटे वडे ????.

एव्हाना ३ वाजले होते. दीड वर्षांतला माझा हा पहिलाच ट्रेक. पाय नक्कीच दुखत होते. पण जाम मजा आली. ऑफिसाच्या कामातून जरा वेगळं काहीतरी. प्रस्सन वाटलं आज. मग बाईक पार्किंगपाशी आलो आणि परत मुंबईच्या दिशेनं प्रवास सुरु केला. येताना जेवढा पाऊस कोसळला, तेव्हढा ट्रेक करताना अजिबात पडला नाही. आता त्याचीच उणीव परतीच्या प्रवासात वरुणराजाने भरून काढली. घरी आलो तो अगदी ओला चिंब होऊन. आंघोळ करून, फ्रेश झालो. हातात वाफाळता चहा, आणि समोर पाऊस! ????