Sindhudurga Fort | Unexplored History | सिंधुदुर्ग किल्ला | माहीत नसलेला इतिहास

Tripoto

मित्रानो आज आपण पाहणार आहोत मालवण मधील सिंधुदुर्ग किल्ला...

किल्ल्यावर बोटीने जावे लागते, त्याचे तिकीट दर प्रौढांसाठी ९० रुपये आणि लहान मुलांसाठी ५० रुपये आहेत.

मालवण हे कुडाळ रेल्वे स्टेशन पासून जवळ जवळ २५ किलोमीटर लांब आहे.

कुडाळ किंवा कणकवली वरून तुम्ही एस. टी. किंवा रिक्षा ने मालवण पर्यंत पोहोचू शकता. सिंधुदुर्गा किल्ला किनार्यापासून १ किलोमीटर आत समुद्रात आहे.

दिवसाची जर पहिलीच फेरी असेल तर नावाडी समुद्राला नारळ वाहून त्याची सुरुवात करतो. समुद्राच्या तळाशी असलेल्या दगडांमधून वाट काढत किल्ल्या पर्यंत पोहोचण्याचे कौशल्य इथल्या नाविकांकडेच आहे.

जसजसं आपण किल्ल्याजवळ पोहोचतो तसतशी त्याची भव्यता आपल्याला जाणवू लागते. ४८ एकरात पसरलेल्या या किल्याचे बांधकाम २५ नोव्हेंबर १६६४ रोजी सुरु झाले,

आणि पुढील ३ वर्षात म्हणजे १६६७ साली पूर्ण झाले.

बोटीने उतरताच तुम्हाला किल्ल्याच्या दगडांमध्ये एक विशेषता जाणवेल. इथले दगड हे वेगवेगळ्या रंगांचे आहेत. किल्याचे बांधकाम हे इतर किल्यांप्रमाणे बेसॉल्ट च्या दगडाचे नाही. संपूर्ण किल्ला हा एका वेगळ्याच दगडाने बनवला आहे. खरंतर ज्या कुरटे बेटावर हा किल्ला बनवण्यात आला आहे तो संपूर्ण बेटच एका नैसर्गिक आणि भौगोली परिस्तिथीमुळे तयार झाला आहे. या विशिष्ठ दगडाला क्वार्टझाईट रॉक्स म्हणतात.

सह्याद्रीची निर्मिती हि लाव्हा रसापासून झाली हे आपण सर्वाना माहीत आहे. तो दगड म्हणजे बेसाल्ट रॉक. पण हा क्वार्टझाईट रॉक्स समुद्रातील गाळा पासून तयार होतो.

किनाऱ्यावरील दगडांची झीज होऊन त्याची वाळू बनते. ती लाटांसोबत समुद्रात परत जाते,

कालांतराने समुद्रात वाळूचे थर साचत जातात (देवबाग मधील त्सुनामी आयलंड त्याचाच एक प्रकार). बरेच वर्ष लोटल्याने आणि अतिप्रचंड दबावामुळे या वाळूच्या थरांचे रूपांतर दगडांमध्ये होते. या दगडांचा संबंध जेव्हा भूगर्भातील उष्णतेशी येतो तेव्हा त्यातील खनिजे विरघळून अधिक टणक असा दगड तयार होतो. जो ग्रेनाईट पेक्षा हि भक्कम असतो.

समुद्र आणि किनाऱ्याच्या हालचालींमुळे किंवा समुद्रातुन जमिनीकडे येणाऱ्या लाव्हाच्या दबावामुळे हे बेट समुद्राच्या पातळीच्या वर आले असावे.

समुद्रातून किनाऱ्याकडे जात असल्यामुळे त्या दगडांची टोकं पश्चिम पूर्व अशा दिशांमध्ये बाणासारखी बाहेर आलेली दिसतात. मालवण च्या पुढे निवती येथील निवती रॉक्स हे देखील त्याचे उदाहरण आहे.

ज्या कोळ्यांनी किल्ला बांधण्यासाठी हे कुरटे बेट शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आली होती. पुढे किल्ला बांधण्यासाठी १ कोटी होन खर्ची पडले होते.

किल्ल्याच्या बुरुजांवर काही फट तुम्हांला जागो जागी दिसेल. यांचा उपयोग बुरुजा खाली लक्ष ठेवण्यासाठी होत असत. अशा प्रकारच्या खिडक्या वेगवेगळ्या आकारात आणि वेगवेगळ्या कोनात संपूर्ण तटबंदीत आणि बुरुजावर आहेत.

दरवाज्यावर एक बुरुज आहे. जिथून संपूर्ण किल्ला आणि किनाऱ्यापर्यंतचा भाग सहज दिसून येतो. तेथून वेगवेगळ्या खिडक्यांमधून वेगवेगळ्या दिशेस नजर ठेवता येते. आधी या वास्तूला लाकडी माळा असायचा.

त्याच्याच शेजारी बुरुजावर एक जागा आहे. जिथून एकाच वेळी समुद्रावर आणि दरवाज्यावर लक्ष ठेवता येते.

याच बुरुजाच्या उजव्या बाजूला मंदिर स्वरूपात एक छोटाशी वास्तू दिसते, येथे शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा आहे. आणि त्याच्या वरील बाजूस शिवाजी महाराजांच्या हाताचा ठसा आहे.

भक्कम ४२ बुरुज किल्याला आहेत. हे बुरुज बांधण्यासाठी तटाच्या पायात ५०० खंडी शिसे घातले गेले आहेत. त्यावर हे बुरुज आजही भक्कम पणे उभे आहेत.

किल्ल्याची तटबंदी जवळ जवळ ३ किलोमीटर पसरलेली आहे. दक्षिणेकडच्या तटा खाली चंद्राकृती व मऊ रेतीची छोटी पुळण आहे. याला ‘राणीची वेळा’ किंवा ‘राणीच्या समुद्रस्नानाची जागा’ म्हणत.

किल्ल्यात मध्यभागी छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीत बांधलेले शिवाजी महाराजांचे श्री शिवराजेश्वर हे मंदिर आहे. मंदिराचे सभागृह कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांनी उभारले आहे. अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी शिवाजी महाराजांची बैठी प्रतिमा फक्त येथे दिसते. येथे शिवाजी महाराजांच्या हाताच्या आणि पायाचा चांदीचा ठसा व एक म्यानात ठेवलेली तलवार ठेवलेली तुम्हाला दिसेल.

पुढे एक महादेवाचे मंदिर आहे. याच मंदिरात शिवकालीन भुयार देखील आहे. त्या काळी गुप्तहेराना येण्याजाण्यासाठी किंवा आणीबाणीच्या वेळी सुटका करून घेण्यासाठी या मार्गाचा उपयोग केला जात असावा.

समुद्राच्या मधोमध हा किल्ला बनवलेला आहे. पण या किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची उपलब्धतता मुबलक प्रमाणात आहे. चारही बाजूला समुद्र असूनही किल्यावर गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. दहीबाव, दूधबाव, साखरबाव अशा या ३ विहिरी आजही लोकांची तहान भागव आहेत.

किल्ल्यावर काही लोक वस्ती सुद्धा आहे. एक पूर्व प्रार्थमिक शाळा सुद्धा आहे. किल्ल्यावर तुम्हाला नारळाची झाडं बरीच दिसतील

किल्ल्यावरील भवानी मंदिर व हनुमान मंदिर आणि जरीमरी माता मंदिर देखील आहे.

किल्ल्यावरील मध्यवर्ती जागा, जेथे ध्वज फडकवला जाणतो. पर्यटकांसाठी आकर्षणाची जागा. कारण येथून संपूर्ण किल्ला पाहता येतो

किल्ल्यावर अगोदर मराठयांचा भगवा ध्वज २२८ फूट उंच होता

जो समुद्रात लांबूनही दिसायचा

मराठयांचा हा भगवा ध्वज १८१२ पर्यंत किल्यावर फडकत होता.

ज्याचे घोडदळ त्याची जमीन आणि ज्याचे आरमार त्याचा समुद्र. हे शिवाजी महाराजांनी तेव्हाच ओळखले होते. म्हणूनच शिवाजी महाराजाना भारतीय नौसेनेचे जनक देखील मानले जाते.

शिवाजी महाराजांच्या आरमारात सिंधुदुर्गला फार महत्त्व होते. शिवकाळात लिहिलेल्या बखरीत सिंधुदुर्गला शिवलंका म्हणून देखील संबोधले आहे.

म्हणून जर तुम्ही कधी सिंधुदुर्ग जिल्यात आलात, तर या बलाढ्य सिंधुदुर्ग किल्याला जरूर भेट द्या