भटकंती चा सफरनामा!

Tripoto
21st Jul 2019
Day 1

भटकंती चा सफरनामा !♥
लेखन आणि अनुभव : सार्थक निवाते

स्वर्गसुखाची माझी व्याख्या एवढीच की, मनसोक्त भटकणे.. एखाद्या अनोख्या ठिकाणी जावे. फोन बंद ठेवावा. सोबत एक चटकदार कादंबरी असावी. आणि एखाद्या लहानबाळासारखं भाबडेपणाने गवत तृणावर रेलावं ... हा माझा आवडता उद्योग, छंद.. हवं तर व्यसनच म्हणा ना !

सकाळी सकाळी आईने समोर ठेवलेल्या वाफाळलेल्या चहाच्या साक्षीने, वर्तमानपत्र उघडले आणि थेट संपदकीय पानावर चाळाचाळ करून नाटकाच्या जाहिरातींकडे आलो. आज माझ्या आवडत्या नाटकाचा प्रयोग, आवडत्या रंगमंदिरात लागला होता पण, व्यस्थ जगापासून काही काळ अलिप्त होऊन भटकायला जावं की, प्रयोगाला जाऊन मराठी नाट्यसृष्टीची गोडी रुचवावी ह्याच सरळसोप्या संभ्रमात होतो.

पण राहून न राहून मी नाटकाऐवजी भटकायला जायचं ठरवलं. मुंबईपासून जवळपास १२०किमी दूर, माझ्या शांततेच्या अटीपूर्ण करणारे ठिकाण बोलता-बोलता एका मैत्रिणीच्या बोलण्यातून कानावर पडले. म्हणलं चला.. तिथेच काय ते नेमके २-३ दिवस माजा करू. कॅम्पिंगसाठी सर्वतोपरी उपयोगी वस्तूंची बांधाबांध सुरू केली. माझी लगबग पाहून आईने प्रश्न टाकला, 'काय मग राजे.. स्वारी सिद्धिप्राप्तीसाठी नेमकी निघाली कुठं ?'  शुजची लेस बांधून, बॅग खांद्यावर टाकत म्हणालो, 'मातोश्री, सिद्धिप्राप्ती काही सहज गोष्ट नव्हे, त्यासाठी अलिप्त होऊन ध्यानस्थ व्हावे लागते.'
'अरे बाळू, ते सगळे ठीक आहे पण, निघालास कुठं आणि परतीचा प्रवास कधी ?'
'अगं आई, वायूचं वावरणं आपल्या हातात नसतं, ते तो ब्रम्हदेव पाहतो. त्यालाच का नाही विचारत !' आईच्या पायापडून असे म्हणत ओरडत घराबाहेर पडलो.
पाठून आवाज आला, 'कलाकारा, जरा जपून बरं!'
'हो हो' वाहणाऱ्या हवेसारखा आवाजही नाहीसा झाला आणि भटकंतीला सुरवात झाली.

प्रवासाला निघालो ते बेभान होऊनच.. दादरहून रेल्वेच्या जनरल डब्यात बसलो. गर्दी असल्याने दारातच बसलो, पाय पसरून हाताने आधार घेतला. काही काळात हा गुंजारव, ही गर्दी, हा गोंगाट नाहीसा होईल आणि माझ्यातला भटकंतीचा सफरनामा जागा होईल. २ तासांच्या रेल्वे प्रवासानंतर, टेम्पोतून त्या गावाबेहरच्या डोंगराकडे जायला निघालो. पोचता-पोचता एकदा घड्याळावर नजर मारली. फोन बंद करून डायरी-पेन हातात आले. अश्या प्रवासात शब्दांव्यतिरिक्त मजाच नाही,

एक-एकटाच भटकंतीचा, एक-एकला निघाला ।
सफरतशी ही अद्भूत, मी तर वेढवेडा बावळा ।।

त्या सह्याद्रीच्या कुशीत नि:संकोच वावरतानाची अभिलाषा बाळगायलासुद्धा अभिमान वाटायचा. हे म्हणजे फासे न टाकताही डाव आपल्याकडेच फिरल्यासारखे होते. खऱ्याअर्थाने माझ्यातला भटकंतीचा सफरनामा उदयास आला होता. डोंगराच्या पायथ्याशीच नदी असल्यामूळे पाण्याचा प्रश्नच नव्हता. संध्याकाळ होण्याआधी नदीकाठीच टेंट लावला आणि रात्री शेकोटीसाठी लाकडं गोळा केली. हिवाळ्याचे दिवस असल्याने रात्रीची थंडी तर वाजणारच होती. टेम्पोतून येत असतांना ऐकण्यात होतं की, ह्या भागात नदीमुळे जनावर व प्राण्यांचा वावर आहे. तशी भीती तर नव्हतीच पण, काहीतरी नवीन पाहायला मिळावे ही परिचित इच्छा होती.

दुपार सरली नि सूर्यास्तजवळ आला होता. जवळच्या नारळाला चांगले माड आले होते. भरभर पायाला दोर घेतला व सरसर वर गेलो. मोठी कोयती नसल्यानं माझ्याकडे असलेल्या मोठ्या सूऱ्याचा वापर केला. दोन चांगले माड खाली सोडले. खाली उतरताच न राहून एका नारळाचे पाणी प्यायलो आणि अगदी जीव तृप्त झाला. निसर्गाच्या अगाद लिलेची ओळखच पटली जणू. नदीचे पाणी आता संथ होऊन वाहत होते आणि मला जाणवले की, इथे फक्त माझा आणि निसर्गाचा आवाज आहे. किनाऱ्यावर किंचितश्या पाण्यात पाय बुडबून बसलो. पाण्याचा संथ प्रवाह पायाला जाणवू लागला आणि शब्दांचा प्रवाह मनाला जाणवू लागला...

एकट्याची क्षणिक साथी...
नदी तू.. नदी तू..

वाटसरू मी तुझा अतिथी, पाहुनी तुज आनंदी मी..
तू म्हणालीस...
प्रवाह माझा होऊन पहा, मजसंगे वाहून पहा..
भाबडा तुझ्या प्रेमात आंधळा, बघ ! प्रियकर तुझा पाण्यात उभा..

एकट्याची क्षणिक साथी...
नदी तू.. नदी तू..

सूर्य मावळतीला गेला होता आणि काळोखाचा रंग मला रंगवू पाहत होता. पक्ष्यांचा किलबिलाट हळूहळू नाहीसा झाला. रातकिड्यांची किणकिण आणि काजव्यांचा प्रकाश फुलताना पाहून अगदी स्वप्नाच्या दुनियेत आल्यासारखे वाटले. जशी जशी रात्र तग धरत होती, तसे थंडीला उधाण येत होते. लाकडं एकसारखी रचून शेकोटी लावली. दोन-तीन दिवस जातील एवढे जेवणाचे सामान बॅगमधे होते. पोटापूरते शिजवून गरम गरम खाऊन घेतले आणि माऊथ ऑर्गन ने त्या एकट्या शांत रात्रीत जीव भरायचा प्रयत्न केला. किशोर कुमार यांचया 'चला जाता हूं, किसीं की धून मे.. तडकथे दिल के सितारे लिये..' गाण्याची धून वाजवली नि आसपासच्या झुडुपात हालचाल झाल्याचं दिसलं. कुतूहल होतं की, काहीतरी नामानिराळे पाहण्याची संधी मिळेल. हळूच उठलो तर, पटकन कोरड्या झुडुपातून साळिंदराचे दर्शन झाले. त्याचे तीक्ष्ण, लांब, सुबक काटे दिसले. कुठेही तो साळिंदर, माझ्यावर तुटन पडेल असे जाणवले नाही. आणि मी पुन्हा शेकोटीजवळ बसून नवनव्या चाली वाजवू लागलो. जश्या चाली बदलत होत्या, तसं साळिंदर शेकोटीच्या अधिक जवळ सरकत होता. तब्बल अर्ध्या तासाने, लाकडी ओंडक्या जवळ तो साळिंदर निद्रिस्त झाला. माझ्यासाठी हा प्रसंग स्वप्नाहून कमी नव्हता.

साळिंदरा साळिंदरा..
अवचित गाठ तुझी नि माझी
रात्रीला ही आवडली...|
मम गाण्याची अंगाई करुनी
सुप्त आठवण साठवली..||

आणि शब्दांनी हा प्रसंग कोरणंच मी रुचकर मानलं. गारगार वारं बोचू लागल्यानं चोरपावलांनी टेंटमधे शिरलो, सकाळी पुन्हा साळिंदराचे दर्शन व्हावे या भाबड्या स्वप्नात रमत रमत झोपी गेलो.

पहाटे ५.३०च्या आसपास डोळे उघडले. थंडी असल्यानं उठण्याची मुळीच इच्छा नव्हती पण, सूर्योदय पाहून आदित्याच्या दर्शनासाठी आसुसलो होतो. लगेचच आवरून डोंगरमाथ्याच्या दिशेने निघालो, चढाई तशी सोपीच म्हणावी पण, वाट निसरडी होती. धुक्याने गवतावर दव पडलं होतं. शिरशीऱ्या थंडीला सोसत अवघ्या काही मिनिटात माथ्यावर पोहोचलो. ते वातावरण काही खासचं, काही निराळेच वाटत होते. जणूकाही ते फक्त माझ्या शांततेच्या अटी पूर्ण करण्याच्या अनुषंगानं साकारलं असावं. सूर्योदयाची वेळ झाली, मी भास्करच्या वाटेकडे डोळे लावून बसलो. उदय होताच ते क्षण मनाच्या कॅमेरात टिपले ते कायमचेच... आणि पुन्हा शब्दांचा प्रभाव मी थांबवू शकलो नाही.

हे भास्करा...
करुणाकरा, तेजोमय अन उल्हसित तू..
आयुष्याचं नवं वेड तू...||
वेड्या सैरभैर लेखकाचं
उदयाचं नूतन वेड तू...||

- सार्थक निवाते

Photo of भटकंती चा सफरनामा! by Sarthak Niwate