#कोकण म्हणजे जणू स्वर्गच.
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, कोणताही ऋतू असो, प्रत्येक ऋतुत मन प्रसन्न करून सोडणारे वातावरण या कोकणात असते.
पावसाळा संपून हिवाळ्याची जसजशी चाहूल लागायला सुरुवात होते तेव्हा वेध लागतात ते गावा गावातील उत्सव आणि जत्रांचे. मंदिरांतील जत्रा म्हणजे तळ कोकणाची वेगळी ओळख. गावातील लोकांनी एकत्र यावे हा त्या मागचा उद्देश.
या जत्रांमधील दुकानं वेगवेगळ्या खाद्यपदार्थांनी भरून असतात. अशा जत्रा आणि उत्सवांचे प्रमुख आकर्षण असते ते तिथे सादर होणारे #दशावतार.
दशावतारला कोकणात #दहीकाला सुद्धा म्हणतात.
कोकण आणि दशावतार हे वेगळंच समिकरण आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही लोककला कोकणात अजूनही जपली गेली आहे ती या कलाकारांमुळेच.
दशावतार म्हणजे #विष्णूचे दहा अवतार. #कर्नाटकातील #यक्षगान परंपरेशी साधर्म्य असल्यामुळे याची पाळेमुळे दक्षिणेत रूजलेली असावित असे मानले जाते. #गोवा #सिंधुदुर्गात दशावतार तर #रत्नागिरी #रायगड मध्ये नमन असा या कलेचा प्रवास होत गेला आहे.
सिंधुदुर्गातील #राजापूर ते #वेंगुर्ले आणि आता पुढे गोवा, कर्नाटक पर्यंत दशावतारी नाटके केली जातात. मुंबई पुणे सारख्या शहरांपासून थेट #दिल्ली पर्यंत आता दशावताराचे प्रयोग होऊ लागले आहेत. दशावतार पाहण्यासाठी कोकणी माणूस नेहमीच उत्सुक असतो. म्हणून दशावतार हा कोकणातला जिव्हाळ्याचा विषय आहे.
विष्णूचे दहा अवतार मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशूराम, राम, कृष्ण, कलकी आणि बुद्ध यातील फक्त #वामन, #परशूराम, #राम आणि #कृष्ण हे चारच अवतार नाटकात दाखवले जातात.
गावातील जत्रा म्हणजे दशावतारी कलाकारांना आपली कला सादर करण्याचे हक्काचे स्थान.
पुर्वी मोजक्याच दशावतारी कंपन्या असत, त्या कंपन्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता बऱ्याच नवीन कंपन्या चालू झाल्या आहेत. त्यामुळे आता दशावतार जास्त लोकाभिमुख होत चालला आहे.
दशावतार रंगमंचावर सुरू होण्याआधी रंगमंचामागे #गणपती आणि कलाकारांच्या साहित्यांची आरती आणि पुजा केली जाते.
रंगमंचावरील सादरीकरणाचे स्वरूप हे वर्षानुरूप चालत आलेल्या पद्धतीनेच केले जाते.
आधी गणपतीस्तवन, मग पुर्वरंगात रिद्धी सिद्धी, भटजी, संकासूर, सरस्वती, ब्रम्हा, विष्णू यांचे प्रवेश आणि उत्तरार्धात #रामायण, #महाभारत मधील पौराणिक कथा दाखवली जाते. महत्वाचं म्हणजे दशावतारी नाटकांची लिखित संहिता नसते, स्वतःची रंगभूषा करायला सुरुवात करण्याच्या काही क्षण अगोदर कोणते कथानक करायचे हे कलाकारांना सांगितले जाते. त्यानुसार प्रत्येक पात्र स्वतःचे संवाद तयार करतात.
या कथानकातील रंगभूषा, वेशभूषा, अभिनय, संवादफेक, संगीत कथानक, युद्धनृत्य या सर्वांचे सादरीकरण आणि कलाकारांचे कौशल्य अनुभवण्यासाठी रसिक #प्रेक्षक रात्रभर हे नाटक बघत असतात. हि नाटके रात्री १०-११ वाजता सुरू होऊन रंगत रंगत पहाटे पर्यंत चालू असतात.
प्रत्येक दशावतारी कलाकार आपल्या पात्राची तयारी स्वतःच करतो. प्रत्येकाचे संवाद स्वतःचेच असतात. रंगभूषाही स्वतःच केली जाते. रंगभुषेसाठी खडूचे रंग वापरले जातात. देव देवतांच्या व्यक्तीरेखेसाठी निळा, पांढरा असे सौम्य रंग व राक्षस किंवा नकारात्मक व्यक्तीरेखेसाठी लाल, काळा असे उग्र रंग वापरले जातात.
समोर जी महिला आपली कला उत्तम प्रकारे सादर करीत आहे खरंतर ती महिला नसून तो एक पुरुष आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे दशावतारी नटकांत काम करणारे सर्व कलाकार हे पुरूषच असतात. स्त्रि भुमिका करणाऱ्या पुरूषांचा मेकअप आणि पेहराव तर खऱ्या स्त्रियांना सुद्धा लाजवेल असा असतो.
देव-दानवांचे युध्द म्हणजे दशावतारी नाटकातील अजून एक प्रमुख आकर्षण, राक्षसाचा प्रवेश कधीकधी समोरच्या बाजूने प्रेक्षकांच्या गर्दीतून होतो. त्याचं ते भयानक रौद्र रूप, आरोळया, हातातील लखलखणरी तलवारी व किंकाळ्या यामुळे प्रेक्षक घाबरतात. पुढे देव आणि दानव यांच्यात नृत्य स्वरुपात लढाई होते, तीसुद्धा पाहण्यासारखी असते.
रंगमंचावर दिसणारा कलाकार आणि खऱ्या आयुष्यात दिसणारी ती व्यक्ती, यात खुपच फरक असतो.
दशावतारी नाटकांचा काळ हा साधारण ४ ते ५ महिन्यांचा असतो. बाकी वेळ प्रत्येक कलाकार हा आपापल्या परीने शेती किंवा नोकरी व्यवसाय करून आपले घर चालवत असतो. फक्त कलेच्या आवडीपोटी हे कलाकार आपले योगदान देत असतात. आणि खरंतर याच कलाकारंमुळे दशावतार ही कला अजूनही कोकणात टिकून आहे.
रसिकांवर अभिनयाची मोहीनी घालणाऱ्या दशावतारी कलाकारांची या कलेतून मिळणारी आर्थिक मिळकत ही खुप कमी असते. मात्र असे असूनही कलाकार कलेच्या श्रद्धेपोटी निष्ठेने काम करत असतात.
कोकणातील दशावतार व ही कला सादर करणारे कलाकार हे कोकणचे वैभवच नाही तर कोकणचा अविभाज्य घटक आहेत. म्हणून हि कला यापुढेही वृद्धिंगत वाढत जाईल यात तिळमात्रही शंका नाही.