घेरा केंजळ

Tripoto
Photo of घेरा केंजळ 1/8 by Manjiri

पुणे सातारा हायवेला अनेक जादूच्या वाटा फुटतात. उंब्रजची, वाईची, भोरची. ह्यापैकी कुठल्याही वाटेला लागलं की पहिल्या किलोमीटरमध्ये हायवे टच शॉपिंग कॉम्प्लेक्सचा विद्रुपपणा संपतो. त्यानंतर देखणी वाट सुरळीत होते. दोबाजूंना वडाची पारंबीदार झाडं सलामीला उभी असतात. त्या पलीकडे उसाची शेतं, आणखी आत जावं तशी बटाट्याची, भुईमुगाची लागवड दिसु लागते.

आशीच भोरला जाणारी जादूई वाट घेउन आम्ही निघालो. यावेळी होरा होता घेरा केंजळ - केंजळगडाचा. प्रथम वाटेत घोड्याच्या नालेसारखा दिसणारा नदीप्रवाह पाहणे अर्थात मॅंडेटरी.त्यानंतर भाटघर धरणाचा सांडवा ओलांडून, भोर बाहेरुन घेरा केंजळकडे कूच केली.

Photo of घेरा केंजळ 2/8 by Manjiri

एकदा आंबवडं पार केलं की भोवताल परत बदलतो. श्रावण भादव्याचे दिवस, टेकड्या डोंगरावर पाचूची हिरवळ पसरलेली. भाताची खाचरं तुडुंब भरून पाणी बांध ओलांडून धावत असते. पावसाच्या सरी बरसत असतात. जिवा महालाचं, कान्होजी जेध्यांचं गाव ओलांडून घेरा केंजळच्या कवेत शिरतो. डोंगरकडे उंच होत जातात. त्यावरुन पाण्याच्या फेसाळ शुभ्र धारा बेभ्हान उड्या मारतात. वाऱ्याच्या प्रचंड रेटयाने उलट्या फेकल्या जातात. बरसतात, उसळत राहतात.

Photo of घेरा केंजळ 3/8 by Manjiri

आता आम्ही वाहनं सोडून पायउतार झालो. रेनकोट वगैरे जामानिम्याला काही अर्थ नसतो. पायताणं मात्र भरवश्याची हवीत. उतरल्यावर स्वप्रतीमा, आणि आश्चर्योद्गार आटपून आम्ही चढाईला सुरवात करतो. आमचा ग्रुप पण भारी आहे! नऊ-दहा वर्षाच्या चिमूरडीपासुन अर्धशतकाची मजल गाठू पाहणारे असे सोळाजण. कोणी बडबडे, कोणी धडपडे, कोणी सेल्फीतज्ञ, कोणी माहितगार, कोणी खजिनदार, आणि काही माझ्यासारखे उत्साहाचे भांडवलदार. हायवेवर धाब्यावर मिसळ चापून आता गडचढाईला मावळे तयार. सडक नावडल्याने काही मावळे शॉर्टकट अटेंप्ट करतात. थोडेसे घसरत, थोडे ठेचकाळत, वर पोहोचतात. आता डांबरी सडक मागे टाकून चिखल - गवताची पायवाट चालू होते. मधूनच पाऊस बरसतो. अंगावरची सगळी शहरीपणाची - व्यवहाराची पुटं धुवून टाकतो.

Photo of घेरा केंजळ 4/8 by Manjiri

वाटेत गाव लागतं, गावकरी भेटतात. एखादा म्हातारा "ह्याच वाटेनं जावा देवा... पोचाल की!" असा धीर देतो. उंबऱ्यापाशी उभी असणारी कोणी गुजाक्का "न्हाई जमायचं तुमास्नी" असं भाकीत करते. मग माझ्या डोळ्यातलं पॅनिक बघून पवित्रा बदलते..."जमंल जमंल तुमाला, दमानं जा" असा धीर देते. वाटेत दगडु जंगम "काय जेवणाची वेवस्था?" असे म्हणून भाकरी पिठल्याची ऑर्डर घेतो. आता चढाईची वाट केवळ दीड पाउल रुंदीची चिकट झालीय. माझं सगळं भान, पुढचं पाऊल कुठे टाकायचं ह्यावर एकवटतं. सांभाळून पावलं टाकत, एका कतारीत निघतो. स्थिर पायाचे भिडू डळमळीत गड्यांना आधार देतात. सगळेजण गड सर करतात. आता आम्ही ढगात पोहोचलेलो असतो. पावसाळ्यात सगळे गडकोट रुद्रसुंदर भासतात. ढगांचे भस्म चर्चून रानफुलांच्या माळा धारण करुन आत्ममग्न. आम्ही वरून दिसणाऱ्या विहंगम दृष्याने भरून पावतो. वरच्या जरीपटक्यापाशी विसावतो. कड्यांवरून दरीत डोकावतो. दऱ्या कधी धुक्याने भरलेल्या. कधी तो पडदा झिरझिरीत होऊन नाहीसा होतो. पलीकडचे धोमचे बॅकवॉटर, कमलगड, म्हातारीचे दात, दरीतली खेडी यांवर चालणारा ऊनसावलीचा खेळ डोळे भरून पाहतो.

Photo of घेरा केंजळ 5/8 by Manjiri
Photo of घेरा केंजळ 6/8 by Manjiri
Photo of घेरा केंजळ 7/8 by Manjiri
Photo of घेरा केंजळ 8/8 by Manjiri

वरच्या बालेकिल्ल्याच्या पायऱ्या चढून टोकापर्यंत जातो. वाटेत गड्यांच्या चारपाच धडपडी होतात. आता परत निघायची वेळ होते. पाय निघत नसतात तरी निघतो. ती निसरडी वाट चढण्याहून उतरणं जास्त कठीण आहे, याचा साक्षात्कार होतो. सगळेजण आबदार पावलं टाकत गडउतार होतो.

भाकरतुकडा खायला दगडूबाबांच्या घरी थडकतो. तिथं ओसरीवर मांड्या ठोकतो. आमच्या समोरच आडोश्याला बांधलेले एक रेडकू आणि एक वासरू आपल्या काळ्याभोर डोळ्यांनी आम्हाला निरखत उभी. घरात नाकाने शेंबूड ओढणारी पाच सहा पोरं, दोन बाप्ये आणि भाकऱ्या थापणारी कारभारीण. ओसरीवर शांत ओलसर काळोख. वरच्या कौलाच्या फटीतून येणारा उजेडाचा कवडसा. समोर येणारं अन्नब्रम्ह, भाकरीच्या चतकोरांची चळत, पिठलं आणि कांदा. लगबगीनं वाढणारी पोरं आणि आवाज बंद करून उदरभरण करणारे आम्ही सगळे. तृप्त होऊन परतीची वाट धरतो. परतताना मन अजुन घारीसारखं गडावरच स्थिरावलेलं. परतीच्या वाटेवर "टपरीवर"च घेतलेला चहा आणि चहात बुडवायला ग्लुकोज बिस्किटं. आणि गप्पा सगळ्या पुढची चढाई कुठल्या गडाची याच्या.

Tagged:
##trek