वाचून एखाद्याला खरं वाटणार नाही पण निसर्गाच सुखद आणि बेभान रूप एकाच वेळी अनुभवण्यासाठी काल ३५०० फुटांची उंची सर करावी लागली.
किल्ले तुंग...म्हणजे उत्तुंग किंवा उंच.
शिवाजी महाराजांनी त्याचे चढण्याचे कठीणपण ध्यानात घेउन नाव दिले "कठीणगड".
अर्थात मावळ प्रांताचा आणखी एक रक्षक.🚩
नाव जरी कठीणगड तरी चढण्यास तसा सोप्पा.. हा गड मुळात एका छोट्या डोंगरावरील पठारावर विसावला असल्याने लांबून बघताना तो मात्र अतिशय उंच नि चढण्यास कठीण असा भासतो.
गड सर करायला सोप्पा जरी असला तरी अरुंद पायवाटेवरून चालताना डाव्या बाजूची खोल दरी अंगावर शहारे आणत असे.
किल्ल्याच्या पायथ्यापासून अगदी पार कळस गाठेपर्यंत सतत वाटेतले थंडगार पाण्याचे झरे पायांना दिलासा देत होते.
अधून मधून याच झऱ्यांच्या वाढत्या प्रवाहामुळे पुढची वाट दिसेनाशी व्हायची.
पाय वाटेला लागूनच आलेली ठेंगणी झुडुपे, मध्येच कुठून से डोकावू पाहणारे केळफुलांचे खांब, हिरवळीवर हलकेच वळवळणारे किडे सगळंच कसं जिवंत वाटे.
सतत झुडूप, झाडांची सळसळ, पाऊसाची रिमझिम आणि धुक्याचा चाललेला लपंडाव एक वेगळाच अनुभव देऊन गेले.
सुरुवातीला हवीहवीशी वाटणारी वाऱ्याची झुळूक जसजसा गड सर करत जाऊ तशी बेभान होत जाते..सोसाट्याच्या वारा सुटतो आणि मग लागतो खरा कस.
गड तसा बऱ्यापैकी पडझड झालेला, पण गड सर केल्याचा आनंद आणि समाधान हे काही औरच...
उत्तम ट्रेकर आणि गड किल्ल्यांची भरमसाठ माहिती असणारे सोबत असल्यामुळे किल्ल्याची ऐतिहासिक बाजू ही समजली.
एकंदरीत काय थोडं बिचकुन च का होईना पण निसर्ग अनुभवत, प्रसंगी घाबरत गड सर झाला.
कठीण वाटणारा पण निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जाणारा किल्ले तुंग (कठीण गड) फत्ते. 🚩
- नम्रता बर्वे
22 जुलै 2018